पुणे - विद्यार्थ्यांचा पत्रातून पालकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश
पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। लोकशाहीची जाणीव आणि आदर लहान वयातच रुजावा आणि त्यातून पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे मतदान जनजागृतीचा ‘प्रिय आई–
पुणे - विद्यार्थ्यांचा पत्रातून पालकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश


पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। लोकशाहीची जाणीव आणि आदर लहान वयातच रुजावा आणि त्यातून पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे मतदान जनजागृतीचा ‘प्रिय आई–बाबा, पत्रास कारण की…’ हा आगळा–वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्त शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई-वडिलांना पत्राच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन केले.

महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त ममता शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापालिकेच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली गायकवाड यांच्यासह शाळेतील शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

मतदान जनजागृती पथनाट्याच्या सादरीकरणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो, तर मतदानामुळे लोकशाही वाचते. त्यामुळे रक्तदान व मतदान दोन्हींचे खूप महत्त्व आहे, असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. त्यानंतर फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. लोकशाहीत मताधिकाराचे स्थान आणि नागरिक म्हणून असलेली जबाबदारी या सादरीकरणांतून प्रभावीपणे मांडण्यात आली.

शाळेतील विद्यार्थिनी वेदिका जाधव हिने यावेळी ‘प्रिय आई–बाबा, पत्रास कारण की…’ या उपक्रमांतर्गत स्वतःच्या आई-वडिलांना लिहिलेल्या पत्राचे वाचन करीत लोकशाहीप्रती असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना शब्दरूपात मांडल्या. तसेच पालकांना आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना पत्रांचे वाटप करण्यात आले. शिक्षकांना मतदानाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार पर्यवेक्षिका वैशाली गायकवाड यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande