
पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामांमध्ये भ्रष्टाचार, निविदेतील रिंग, श्वानाच्या नसबंदीतील घोटाळे, डांबरी रस्त्यावर सिमेंट कोणी टाकले. लाच प्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाला अटक झाली. कोयता गॅंगने शहरात हैदोस घातला. अशा अनेक गोष्टी शहरात घडल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीवर काहीही बोलणार नाही. पण, यात सुधारणा करण्यासाठी शहरातील कारभारी बदला’, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या प्रगतीला गतीमान करणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. शिवसेना विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. शहरात बदल, परिवर्तन घडविण्याची, कारभारी बदलण्याची वेळ आली आहे. इतिहास टक्कर देणाऱ्यांचाच लिहिला जातो, तडजोड करणाऱ्यांचा नाही. त्यामुळे कोणालाही घाबरू नका आणि बिनधास्त लढा. गेल्या तीन वर्षांपासून माझ्यावर सातत्याने टीका होत आहे. शिव्याशाप दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्हीही संयम ठेवा. हाल होतील, पण हार होणार नाही. सत्याला त्रास होतो, पण सत्य कधीही पराभूत होत नाही. शिवसेना स्वबळावर लढत असून तिला कोणीही हलक्यात घेऊ नये’.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु