
पुणे, 10 जानेवारी, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात येत्या रविवारी, ११ जानेवारी रोजी “भव्य विंटेज कार रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीला पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथून सकाळी ९ वाजता सुरुवात होणार असून रॅलीचा समारोप निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे होणार आहे. या रॅलीच्या निमित्ताने नागरिकांना ऐतिहासिक व दुर्मिळ कार आणि बाईक प्रत्यक्ष पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन शहरामध्ये करण्यात येत आहे. या अनुषंगाने ११ जानेवारी रोजी “भव्य विंटेज कार रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात सकाळी ९ वाजता लिनिअर गार्डन, पिंपळे सौदागर येथून होणार आहे. त्यानंतर लांडेवाडी चौक मार्गे संत तुकाराम नगर, पिंपरी चौक, भाटनगर मार्गे चिंचवड, प्रेमलोक पार्क, आकुर्डी चौक, म्हाळसाकांत चौक मार्गे निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे रॅली विसर्जित होऊन प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. या प्रदर्शनात विविध कंपन्यांच्या दुर्मिळ कार पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु