
पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। इंडो-युरोपियन कॉन्फरन्स ऑन मॅथेमॅटिक्स (Indo-European Conference on Mathematics) ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची गणित परिषद दिनांक १२ ते १६ जानेवारी २०२६ दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद युरोपियन मॅथेमॅटिकल सोसायटी (EMS) आणि द मॅथेमॅटिक्स कॉन्सोर्टियम (TMC), भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER), पुणे हे यजमान व सह-आयोजक आहेत.
परिषदेचे उद्घाटन १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात होणार आहे. उद्घाटन समारंभास युरोपियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष व डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाचे प्राध्यापक प्रा. यान फिलिप सोलोवे तसेच द मॅथेमॅटिक्स कॉन्सोर्टियमचे अध्यक्ष व आयआयटी गांधीनगरचे प्राध्यापक प्रा. जुगल के. वर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी भूषविणार असून, प्र-कुलगुरू प्रा. पराग काळकर व प्रभारी कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या उद्घाटन समारंभाचे मान्यवर अतिथी म्हणून पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रा. आर. बालसुब्रमणियन (इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, चेन्नई), इटलीतील ट्यूरिनो विद्यापीठाच्या प्रा. सुसाना टेराचिनी, तसेच IISER पुण्याचे संचालक प्रा. सुनील एस. भागवत उपस्थित राहणार आहेत.
परिषदेचा शैक्षणिक कार्यक्रम अत्यंत व्यापक असून, त्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गणितज्ञांची १० व्याख्याने (प्लेनरी लेक्चर्स) आणि २० विषयाधारित परिसंवाद, ज्यामध्ये भारत व परदेशातील सुमारे १२० तज्ज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत. याशिवाय आमंत्रित व्याख्याने, संशोधन सादरीकरणे आणि पोस्टर सत्रांचा समावेश असून, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी संवाद व सहकार्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु