
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर शहरासह राज्यातील नेते विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसे उदासीन आहेत याचे ज्वलंत उदाहरण उघडकीस येत आहे. फुलंब्री तालुक्यातील विद्यार्थी जीवघेणा प्रवास करीत आहेत. फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्द आणि शेवता बुद्रुक या गावांच्या मधोमध वाहणाऱ्या गिरिजा नदीवर आजही पूल नाही, ही बाब लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांपासून शाळकरी मुले थर्माकोलवर बसून नदी पार करीत आहेत. मात्र, तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याचे संतापजनक चित्र फुलंब्री तालुक्यात दिसून येत आहे.
या वर्षी मे महिन्यापासूनच पावसाने जोर धरला आणि गिरिजा नदी दुथडी भरून वाहू लागली होती. नदीवर पूल नसल्यामुळे शाळा होऊनही सुरुवातीचे दोन महिने विद्यार्थी घरीच अडकून पडले. या काळात शैक्षणिक नुकसान झालेच; पण प्रशासनानेही मूक भूमिका घेतली. अखेर शिक्षण थांबू नये म्हणून ग्रामस्थांनी थर्माकोलच्या तराफ्याचा आधार घेतला. हा उपाय नसून तो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
असे असतानाही कोणाला गांभीर्य नाही. दररोज लहान मुले, विद्यार्थिनी थर्माकोलवरून वाहत्या नदीतून शाळेत जात आहेत. पाण्याचा वेग, घसरण, तोल जाण्याचा धोका यामुळे प्रत्येक प्रवास म्हणजे मृत्यूशी शर्यत ठरत आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन मुले थर्माकोलवरून थेट नदीत कोसळली होती. सुदैवाने त्या वेळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचवले. हा अपघात झाल्यानंतरही प्रशासन जागे झाले नाही. ग्रामस्थांनी पुन्हा थर्माकोल बांधून मुलांना शाळेत पाठवले, कारण शिक्षण थांबवायचे नाही; 'मुलांना शाळेत पाठवायचे की त्यांचा जीव वाचवायचा?' असा संतप्त सवाल पालक करीत आहेत.
शेवता खुर्द आणि शेवता बुद्रुक या दोन्ही गावाच्या मधून 66 गिरीजा नदी वाहत असल्याने यावर नवीन पुलासाठी ग्रामसभेने वेळोवेळी ठराव घेऊन शासनाला पाठवलेला आहे. तसेच नवीन पुला संदर्भात जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सरकारने नवीन पूल मंजूर करून आम्हा गावकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी केली जात आहे.
फुलंब्री तालुक्यातील शेवता येथील ग्रामीण रस्ता हा देखभाल-दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे आहे. मात्र, नागरिकांची मागणी लक्षात घेऊन बांधकाम विभागाने नाबार्ड योजनेअंतर्गत सरकारकडे नवीन पुलासाठी प्रस्ताव पाठवला आहे. सदरील पूल मंजूर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल
असे सांगितले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis