
पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। प्रामाणिक मिळकतकर भरणाऱ्या पुणेकरांना २० टक्क्यांची सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध सुविधा, महिलांना मोफत पीएमपीचा प्रवास व गुन्हेगारी मुक्त पुणे करण्याचा शब्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वचननाम्याच्या रूपाने पुणेकरांना दिला.
शिवसेना आणि मनसे एकत्रित महापालिका निवडणूक लढवीत आहे. गुरुवारी या दोन्ही पक्षांनी वचननाम्याच्या माध्यमातून पुणेकरांसाठी ‘शब्द ठाकरेंचा’ वचननामा, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर, प्रशांत बधे, बाबू वागस्कर, बाळा शेडगे, आशिष देवधर यांनी जाहीर केला.
वचननाम्यात काय?
नवीन रस्त्यांची निर्मिती करणार, नवीन उड्डाणपुलांची निर्मिती करणार, वाहतूक सुरळीत करण्यासाठी 1 हजारपेक्षा अधिक वॉर्डनची नेमणूक करणार, पुणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करणार, उच्च तंत्रज्ञान वापरून भक्कम रस्त्यांची बांधणी करणार, पिवळ्या, केशरी शिधापत्रिकाधारक नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणार, गुन्हेगारीमुक्त पुणे अन् शहराला 24 तास पाणी पुरवठा करणार, आधुनिक कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणार, पर्यावरणपूरक पद्धतीने नदी पुनरुज्जीत करणार, महापालिका शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढवण्यावर भर देणार, पादचारी मार्ग निर्माण करून पादचारी मार्ग अतिक्रमणमुक्त करणार, गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी नवीन स्वच्छतागृह निर्मिती करणार, पीएमपीची आर्थिक तूट दूर करणार; महिलांसाठी बस फी, जुने वाडे पुनर्बांधणी व पुनर्वसनसाठी प्रयत्न करणार, हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणार, पुणे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार, प्लास्टिकमुक्त पुणे करण्यासाठी प्रयत्न करणार.
यावेळी दोन्ही पक्षांच्या वतीने भाजपवर जोरदार टीका करताना ‘शांत असलेल्या पुण्यात कधी नव्हे एवढे गुन्हेगारीने थैमान घातले आहे. हे शहर पूर्वी राहण्यालायक होते. भाजपची सत्ता आल्यानंतर शहराचे वाटोळे झाले. शहराला लुटून खाल्ल्याची शेकडो प्रकरणे पुणेकरांसमोर येत आहेत. त्यामुळे या वचननाम्याच्या माध्यमातून ‘ठाकरेंचा शब्द, हाच पुण्याचा विकास’ आम्ही पुणेकरांना देत आहोत.’
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु