छ. संभाजीनगर शहरात 50 हजार मोकाट कुत्रे
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल पंचावन्न हजार कुत्रे असल्याची माहिती महापालिकेने शासनाला पाठवली असल्याची माहिती मिळाली आहे यात पाच हजार पाळीव कुत्र्यांचा तर पन्नास हजार मोकाट कुत्र्यांचा समावेश आहे. शहरात मो
छ. संभाजीनगर शहरात 50 हजार मोकाट कुत्रे


छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल पंचावन्न हजार कुत्रे असल्याची माहिती महापालिकेने शासनाला पाठवली असल्याची माहिती मिळाली आहे यात पाच हजार पाळीव कुत्र्यांचा तर पन्नास हजार मोकाट कुत्र्यांचा समावेश आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या जशी वाढत आहे, तशीच त्यांची दहशत देखील वाढत आहे. गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांची झुंडी दिसून येतात. एखाद्या वसाहतीमधील मोकळ्या जागेत, चौकाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी कचरा साचवून ठेवलेला असतो अशा ठिकाणी

कुत्र्यांच्या झुंडी हमखास आढळतात. या झुंडीतील एखादे कुत्रे माणसावर केव्हा हल्ला करेल आणि त्याचा चावा घेईल याचा नेम नसतो. प्रामुख्याने लहान मुले, वृध्द नागरिक,महिलांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत जास्त आहे. एकट्याने त्यांना फिरायला जाणे अवघड होऊन बसले आहे.

डॉग बाईटस् चे प्रमाण वाढू लागल्यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणची शस्त्रक्रिया केली जाऊ लागली. ज्या ठिकाणाहून कुत्रे पकडून आणले आहे त्याच ठिकाणी ते कुत्रे शस्त्रक्रियेनंतर सोडून दिले जाते. शस्त्रक्रियेनंतर कुत्रे अधिक आक्रमक होतात, असे निरीक्षण नोंदवले जात आहे.

मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले. राज्य शासनाने हे आदेश महापालिकांना दिले. मोकाट कुत्र्यांना अन्न देणाऱ्या संस्थांची मदत घेत महापालिकेने कुत्र्यांचे सर्वेक्षण केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे पाच हजार पाळीव कुत्रे असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले तर, पन्नास हजार मोकाट कुत्रे असल्याची माहिती संकलित झाली. ही माहिती राज्य शासनाला पाठवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande