
ठाणे, 10 जानेवारी (हिं.स.)। ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांतील हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे आता ठाण्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना टक्कर देणार आहे. पाठबळ मिळाल्याने ठाणे महानगरपालिका निवडणुकीत निश्चित यश मिळेल असा विश्वास ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केला. तर या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे आहोत, उमेदवारांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रिपब्लिकन बहुजन सेनेचे अध्यक्ष विजय घाटे यांनी दिले.
महाराष्ट्रातील २२ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजाला एकत्र घेऊन अविरतपणे कार्यरत असलेल्या रिपब्लिकन बहुजन सेना पक्षाच्या माध्यमातून दलित-बहुजन समाजासाठी सातत्याने समाजकार्य केले जात आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला मदत करण्याचा निर्धार रिपब्लिकन बहुजन सेनेने केला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन बहुजन सेना ताकदीने मैदानात उतरली आहे. ही निवडणूक केवळ सत्तेची नसून बहुजन समाजाच्या स्वाभिमानाची व विकासाची लढाई असल्याचे विजय घाटे यांनी आज स्पष्ट केले.
त्यांनी केलेल्या विनंतीनुसार दिव्यातील प्रभाग क्रमांक 28 अ च्या त्यांच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची विनंती केली परंतु त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी दिली असल्याने मदत करू शकत नाही परंतु ही लढत मैत्रीपूर्वक करण्यात येईल असे ठरले असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पत्रही देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर