रायगड - आंबेवाडीतील सहा दिवसांचे उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
रायगड, 10 जानेवारी (हिं.स.)। मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी–कोलाड–वरसगाव परिसरातील नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेले साखळी उपोषण अखेर सहा दिवसांनंतर स्थगित करण्यात आले. रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांच
आंबेवाडीतील सहा दिवसांचे उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


रायगड, 10 जानेवारी (हिं.स.)। मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी–कोलाड–वरसगाव परिसरातील नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेले साखळी उपोषण अखेर सहा दिवसांनंतर स्थगित करण्यात आले. रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मध्यस्थीमुळे उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, मात्र ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

आंबेवाडी येथील VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना अवघ्या २०० मीटर अंतरावर सुरक्षित अंडरपास बोगदे उपलब्ध करून देण्यात यावेत, अर्धवट राहिलेले सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, गटारांवरील झाकणे बसवून अपघातांना आळा घालावा, तसेच पेण, नागोठणे, लोणेरे व महाड येथे ज्या धर्तीवर अंडरपास सुविधा देण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर येथेही उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी आंबेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी आंबेवाडी बाजारपेठेत साखळी उपोषण सुरू केले होते.

सलग सहा दिवस उपोषण सुरू असताना शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी धिरज शहा, रोहा तहसीलदार किशोर देशमुख व कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी उपोषणस्थळी भेट देऊन नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी तहसीलदार किशोर देशमुख यांनी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जिल्हा प्रशासन व महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

या आश्वासनानंतर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चालके यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश महाबळे यांच्यासह व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मंत्रालयात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत जर ठोस व अंमलबजावणीयोग्य निर्णय झाला नाही, तर पुन्हा साखळी उपोषणासह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande