
सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील खाजगी आस्थानाचालकांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करिता मतदारांना 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अति. मंगेश झोले यांनी केले आहे.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल. (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थपनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.
तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
सोलापूर जिल्ह्यातील कामगारांकरीता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्या स्तरावर दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला असून कामगारांना मतदानाकरीता सुट्टी अथवा दोन तासांची सवलत आस्थापना मालक देत नसल्यास कार्यालयाचे दुरध्वनी क्र. ०२१७-२७२८४०१ वर संपर्क साधून तक्रार देण्यात यावी, असेही पत्रकात नमूद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड