
पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डी. एस. सावकार अध्यासन आणि विद्यापीठाच्या वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना समकालीन आणि महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या वाद-विवाद स्पर्धेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप संस्कृती, समाज माध्यमांचा प्रभाव, आर्थिक साक्षरता आदी विषयांचा समावेश करण्यात आला असून, एकूण १८ महाविद्यालयांतील ३६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य मा. श्री. रविंद्र शिंगणापूरकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच समारोपप्रसंगी मा. प्र-कुलगुरू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सदर माहिती वाणिज्य विभागप्रमुख डॉ. जी. शामला आणि डी. एस. सावकार अध्यासन प्रमुख डॉ. अशोक कांबळे यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु