
छत्रपती संभाजीनगर, 10 जानेवारी (हिं.स.)।शिक्षकांमधील साहित्य गुणाला वाव मिळावा, यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही तिसरे शिक्षक साहित्य संमेलन सहा फेब्रुवारी रोजी एमआयटी येथील मंथन सभागृहात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आश्वनी लाठकर यांनी दिली.
संमेलनाध्यक्षपदी पिशोर (ता. कन्नड) येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय गायकवाड यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षणाधिकारी एम. के.देशमुख यांनी शिक्षक साहित्य संमेलन सुरु केले.यंदा हे तिसरे वर्ष आहे. पहिली ते बारावीच्या सर्व शाळांमधील १८०० शिक्षकांना संमेलनासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात होईल. उद्घाटनानंतर निमंत्रित कवींचे संमेलन, दिवसभर कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रम होतील.
साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा या विषयावर १२८ शिक्षकांनी लेख दिले आहेत. ही स्मरणिका संदर्भग्रंथ होईल, असे सांगण्यात आले. संमेलनाध्यक्षपदासाठी चार प्रस्ताव आले होते. समितीने छाननी करुन प्रा. संजय गायकवाड यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. या वेळी सीताराम पवार, व्ही. सी. चौरे, सुनिता वाघ, माजी संमेलनाध्यक्ष आशा खटाडे, डॉ. संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती. संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis