

बीड, 10 जानेवारी, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील मयत ऊसतोड मजूर व रिल स्टार गणेश डोंगरे यांचे कारखाना साईटवर झालेल्या अपघाती व दुःखद निधनाने संपूर्ण परिसर हळहळला. त्यांच्या पश्चात कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता.
प्रसिद्ध रीलस्टार आणि कष्टकरी ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. साखर कारखाना प्रशासनाने आंदोलकांच्या कणखर भूमिकेपुढे नमते घेत, डोंगरे यांच्या कुटुंबाला २१ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
आपल्या रील्सच्या माध्यमातून साध्या भोळ्या स्वभावाने सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले गणेश डोंगरे यांचा ऊसतोडणी दरम्यान अपघाती मृत्यू झाला होता. एका गरीब आणि कष्टाळू कुटुंबाचा आधार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. मात्र, कारखाना प्रशासनाकडून सुरुवातीला मदतीबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जनक्षोभ उसळला होता.
रात्रभर चालले आंदोलन
गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला सन्मानजनक मदत मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलकांनी कारखान्यावर ठिय्या मांडला होता. संजयभाऊ आंधळे, कृष्णा तिडके, माऊली सिरसाट, सतिषबप्पा बडे, अशोकअप्पा निपटे यांच्यासह शेकडो आंदोलक या लढ्यात सहभागी झाले होते. कडाक्याच्या थंडीतही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.
प्रशासनाची माघार आणि मदत
आंदोलनाचा वाढता जोर आणि जनभावना लक्षात घेता, कारखाना प्रशासनाला अखेर चर्चेचे पाऊल उचलावे लागले. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर आणि आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाने २१ लाख रुपये देण्याचे मान्य केले. आज पहाटेच्या सुमारास हा धनादेश अधिकृतपणे डोंगरे यांच्या शोकाकुल कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.
हा विजय केवळ पैशांचा नसून, एका कष्टकरी मजुराच्या हक्काचा आणि संघटित शक्तीचा आहे. गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला या मदतीमुळे थोडा आधार मिळेल, पण कष्टकऱ्यांच्या जीवाचे मोल प्रशासनाने वेळीच ओळखायला हवे.
यावेळी गणेश डोंगरे यांचे कुटुंबीय आणि मोठ्या संख्येने त्यांचे चाहते व ऊसतोड मजूर उपस्थित होते. सोशल मीडियावरही या निर्णयाचे स्वागत होत असून, लढा दिला तरच न्याय मिळतो अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
केलेल्या अथक संघर्षातून व एकजुटीतून डोंगरे कुटुंबाला ₹२१ लाख रुपयांचा धनादेश मिळाला असून ₹४ लाखांची उचल माफी करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis