आनंदाचं झाड’ उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार २०२५ जाहीर
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. ही शाळा दरवर्षी विविध अभिनव शैक्षणिक व साहित्यिक उपक्रम राबवित असून, गेल्या चार वर्षांपासून ‘आनंदाचं झाड’ उत्कृष्ट बाल
आनंदाचं झाड’ उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार २०२५ जाहीर


परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. ही शाळा दरवर्षी विविध अभिनव शैक्षणिक व साहित्यिक उपक्रम राबवित असून, गेल्या चार वर्षांपासून ‘आनंदाचं झाड’ उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. सन २०२५ हे या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.

सन २०२५ साठी महाराष्ट्रातील लेखक व कवींना बालसाहित्याचे ग्रंथ पाठविण्याचे आवाहन शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार यावर्षी राज्यभरातून १४७ लेखक व कवींनी आपले ग्रंथ शाळेकडे पाठविले. शाळेतील विद्यार्थ्यांनी हे सर्व ग्रंथ वाचून, चर्चा करून व आपली मते नोंदवून यावर्षीच्या पुरस्कारासाठी ग्रंथांची निवड केली.

यामध्ये पाच कथासंग्रह, एक कवितासंग्रह आणि एक बंजारा भाषेतील कादंबरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाचे ‘आनंदाचं झाड’ उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार २०२५ खालील लेखक-कवींना जाहीर करण्यात आले आहेत —

प्रमोद धायगुडे – आबली

उत्तम सदाकाळ – बोळातले भूत

मोहन काळे – एकदा आपणच व्हावे मोर

मोतीराम राठोड – झुनकी

सागर शिंगणे – बळीवंशाच्या संस्कारक्षम गोष्टी

भारत पाटील – फुलताना

उर्मिला चाकूरकर – ऑस्ट्रेलियातील सोन्याचा शोध

या पुरस्कारांचे वितरण दि. २५ मार्च २०२६ रोजी पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत गावकरी, विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शाळेची मुख्यमंत्री ईश्वरी राठोड यांनी दिली.

बालसाहित्याच्या माध्यमातून वाचनसंस्कृती रुजविणे, विद्यार्थ्यांना परीक्षणात्मक वाचनाची सवय लावणे आणि बालमनाशी नातं जपणाऱ्या लेखकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे उपक्रम संयोजक युवराज माने व मुख्याध्यापक डी. के. कुलकर्णी यांनी सांगितले.ग्रामीण भागातील शाळा देखील साहित्य चळवळीचे केंद्र ठरू शकतात, हे ‘आनंदाचं झाड’ या उपक्रमातून अधोरेखित होत असून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून निवड होणारा हा पुरस्कार विशेष महत्त्वाचा ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande