
बीड, 10 जानेवारी (हिं.स.)। श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत जाणारा पालखी मार्ग येत्या काळात पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड जिल्ह्यात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'श्री संत वामनभाऊ महाराज यांचा 50 वा पुण्यतिथी सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, बीड येथे 'श्री संत वामनभाऊ महाराज यांचा 50 वा पुण्यतिथी सोहळा' संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या भक्त परिवाराशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्रद्धास्थान श्री संत वामनभाऊ महाराज यांना कोटी कोटी नमन! ईश्वराचे अंश असलेले श्री संत वामनभाऊ महाराज यांचा भक्त म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. श्री संत वामनभाऊ महाराज यांनी दऱ्याखोऱ्यामध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत समाजाला अध्यात्माचा लळा लावला व समाजामध्ये एकोपा आणला. तसेच त्यांनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या व कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होते हा संदेश देखील दिला.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी एक योजना सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत गडाचा विकास होत आहे. तसेच येथून श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत जाणारा पालखी मार्ग देखील येत्या काळात पूर्ण करून, या गडाच्या सर्व कामांची जबाबदारी घेऊ असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis