
अमरावती, 10 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा धोका लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रशिक्षित करण्यात आलेले 300 आपदा मित्र आणि आपदा सखी आता जिल्ह्यातील पूरप्रवण व धोकादायक भागातील 80 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे थेट प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यासाठी 300 आपदा मित्र व सखींची निवड करून त्यांना 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित स्वयंसेवकांना शाळा सुरक्षा कार्यक्रम प्रभावीपणे राबविता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच एक दिवसीय उजळणी प्रशिक्षणही देण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पूर, भूकंप, आग आणि वीज पडणे यांसारख्या संकटांच्या वेळी 'काय करावे आणि काय करू नये' याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रथमोपचार, शोध व बचाव साहित्याची ओळख, जखमींना उचलण्याच्या विविध पद्धती आणि आपत्ती काळातील शासनाची भूमिका या विषयावर प्रात्यक्षिकांसह जनजागृती केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. मान्सून कालावधीत आणि इतर आपत्तींमध्ये हे आपदा मित्र प्रशासनाला मोलाची मदत करत आहेत. या शालेय प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातही या स्वयंसेवकांची ओळख निर्माण होणार असून, आपत्तीच्या वेळी होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मोठे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि जिल्हा शोध व बचाव पथक उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे, कोणतेही मानधन न घेता हे आपदा मित्र समुदाय समन्वयक म्हणून सामाजिक बांधिलकीतून कार्य करत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी