
परभणी, 10 जानेवारी (हिं.स.)।
विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिस्त आणि व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत म्हणून शहरातील डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्यामंदिर व जिजामाता विद्यालयात ‘एक भाकर चुलीवरची’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेच्या संचालिका विनाताई तोष्णीवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुनील तोष्णीवाल, मुख्याध्यापक मनोहर कदम गजानन तिखे उपस्थित होते. या उपक्रमात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मोकळ्या मैदानावर स्वतःचे घर तयार केले. यावेळी 20 विद्यार्थ्यांनी मिळून तयार करण्यात आलेल्या प्रत्येक गटाने स्वतःच्या हाताने चूल पेटवून स्वयंपाक केला. घरात नेहमीच राबणारी आई कष्ट करून स्वतःचा संसार चालवत असते. घरात जेवण बनवणे, भांडे घासणे, घर स्वच्छ ठेवणे, घराची सजावट करणे ह्या सर्व जबाबदार्या आईलाच सातत्याने कराव्या लागतात. त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने चुलीवर बनवलेली बेसन भाकरी, बिट्या, भाजी पोळी अशा विविध प्रकारच्या स्वयंपाकांची डिश बनवल्यात. स्वतः तयार केलेल्या घराला विद्यार्थ्यांनी सजवले होते.
रुचकर स्वयंपाक बनवणार्या आठवी वर्गाच्या जगदंबा निवास गटास प्रथम, छत्रपती निवास द्वितीय क्रमांक तर सातवी च्या अन्नपूर्णा निवास गटास तृतीय क्रमांक देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, अनुप सोळंके, मयूर जोशी यांच्यासह अनेक पालकांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis