
सोलापूर, 10 जानेवारी (हिं.स.)।
राज्यातील ग्रामीण भागात बंजारा समाजाचे वास्तव्य असलेले अनेक तांडे आहेत. या वास्तव्याला तांडा म्हटले जाते. अशा 104 तांड्यांना नवीन ग्रामपंचायतीची म्हणून मान्यता मिळणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने काही दिवसांपूर्वीच 104 नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीबाबत अंतिम निर्णय घेतला आहे.
या नव्या ग्रामपंचायतीत 48 तांडा-वस्त्यांचा समावेश आहे. हे तांडे गेली अनेक वर्षे ग्रामपंचायतींच्या सावलीत होत्या. यामुळे हे तांडे वस्ती विकासापासून दूर होते. अशा तांड्यांना यापुढे स्वतंत्र अस्तित्व मिळेल. यामुळे प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दिशेने एक प्रकारे मोठे पाऊलच आहे. या निर्णयाने या तांड्यांचा विकासाबाबतचा वनवास संपणार आहे.
नवीन ग्रामपंचायत निर्मिती करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे राज्यातून जवळपास 800 प्रस्ताव दाखल झालेले आहेत. नवीन प्रस्तावांची तांत्रिक छाननी करण्यात आली असून यापैकी लोकसंख्या, दोन वस्तीतील अंतर तसेच अन्य सर्व तांत्रिक अटींची पूर्तता केलेल्या 104 नवीन प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. भविष्यात नव्याने जनगणनेची प्रक्रिया राबवली जाईल. या जनगणनेच्या दरम्यान अन्य कोणत्याही प्रशासकीय सीमांमध्ये बदल करता येणार नाहीत. हा नियम लक्षात घेऊन पुढील तीन वर्षे एकाही नवीन ग्रामपंचायतीला मंजुरी दिली जाणार नाही. हे ओळखूनच जनगणनेच्या अगोदरच तांडा वस्त्यांनाही मुख्य विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता शासनाने मंजुरी प्रक्रिया गतीने राबवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड