अमरावतीत अजित पवारांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांचा घणाघात
अमरावती, 10 जानेवारी (हिं.स.) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यातील वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र पलटवार केला आहे. काल अमरावतीत बोलताना अजित पवार यांनी, “इथे कोणी दादागिरी, गुंडगिरी किंवा दहशत माज
अमरावतीत अजित पवारांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांचा घणाघात


अमरावती, 10 जानेवारी (हिं.स.) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यातील वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र पलटवार केला आहे. काल अमरावतीत बोलताना अजित पवार यांनी, “इथे कोणी दादागिरी, गुंडगिरी किंवा दहशत माजवत असेल तर ती मोडून काढली जाईल,” असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “खऱ्या अर्थाने अमरावतीतील गुंडगिरी थांबवायची असेल, तर अजितदादांनी आधी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. सत्तेत राहून सत्तेचा पुरेपूर वापर करायचा आणि बाहेर मात्र भाजपच्या विरोधात असल्याचं भासवायचं, ही दुटप्पी भूमिका आहे.” त्यांनी आरोप केला की, गुंडगर्दी करणारे लोक स्वतः अजित पवारांच्या पक्षातच आहेत. “अजितदादांनी जनतेची दिशाभूल करू नये. सत्तेत असताना काय केलं, हे आधी सांगावं. अमरावतीत सेक्युलर मतांसाठी आमिष दाखवून मतदारांची फसवणूक केली जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. अजित पवारांनी केलेली विधाने म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट असून, प्रत्यक्षात कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या टीकेमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande