
मुंबई, 10 जानेवारी, (हिं.स.)। भ्रष्टाचाराचे पाठीराखे तर हे होतेच.कंत्राटदारांचे रखवालदार तर आहेतच.पण आता खोटी, विघातक षडयंत्र रचणारे श्रीमान उध्दव ठाकरे किती पाताळयंत्री, कपटी, कारस्थानी आहेत हे यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यांना भोली सूरत दिल के खोटे असेच म्हणायची वेळ आलेय, अशा शब्दांत मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली.
संजय पांडे यांच्याबाबतीत तपास यंत्रणांकडे माहिती आली आहे. तेव्हाचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे हे पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकत होते त्यात पांडेंवर कोणाचा दबाव होता ? हा मूळ प्रश्न आहे. असा सवाल करीत मंत्री एँड आशिष शेलार म्हणाले की, उद्धवजी मुख्यमंत्री असताना सीबीआय यंत्रणांनी काम करू नये, इडी ने आर्थिक गुन्हेगारांना पकडू नये आणि पोलिसांनी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करावेत अशी परिस्थिती का होती? याची उत्तरे उध्दवजी तुम्हाला द्यावी लागतील.
नाहीतर आम्ही तुमच्यावर 'भोली सुरत दिल के खोटे...!' या नावाने पुस्तक काढू. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घडलले वसूली, खून आणि उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याचे एक भयंकर प्रकरण म्हणजे सचिन वाझे प्रकरण... आता आणखी एक षडयंत्र उघड झालेय, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर