
पुणे, 10 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सोमवारी हॉल तिकिटे डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
बारावीच्या परीक्षेला आता काही दिवसच शिल्लक राहिले असून तोंडी व लेखी परीक्षा जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने सर्व विभागीय मंडळांमार्फत विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांच्या प्रिंटआऊट उपलब्ध करून दिल्या आहेत. हॉल तिकीट देताना शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु