ठाण्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राजन विचारे मैदानात
ठाणे, 10 जानेवारी (हिं.स.)। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक १३. मात्र या प्रभागात सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल असे ठोस काहीच झालेले नाही. वर्षानुवर्षे तेच चेहरे जिंकून येत असल्याने मतदारां
ठाणे


ठाणे, 10 जानेवारी (हिं.स.)। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक १३. मात्र या प्रभागात सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल असे ठोस काहीच झालेले नाही. वर्षानुवर्षे तेच चेहरे जिंकून येत असल्याने मतदारांना गृहीत धरले जात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपले शिलेदार मैदानात उतरवले आहेत. या प्रभागातून शहाजी खुस्पे, अनिला हिंगे, वैशाली घाटवळ आणि संजय दळवी हे स्थानिक उमेदवार निवडणुक लढवत आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे हे देखील मैदानात उतरवले असून विचारे यांच्या प्रचार दौऱ्याने माजी महापौर धास्तावले आहेत. दरम्यान, प्रभाग क्रमांक १३ मधील मक्तेदारी मतदारच मोडीत काढणार असा विश्वास विचारे यांनी व्यक्त केला.

संत ज्ञानेश्वर नगर, डॉ. गंगाधर नगर मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. आज संपुर्ण प्रभागात घरोघरी प्रचार फेरी काढण्यात आली. या रॅलीत राजन विचारे यांनी आवर्जून सहभागी होत गल्लीबोळात फिरून मतांचा जोगवा मागितला. निवडणुका आल्या की दिखाव्यासाठी थातूरमातूर कामे केली जातात. या बनवाबनवीला नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे यंदा बदल झालाच पाहिजे असे सांगत सुज्ञ मतदारांनो पुन्हा पश्चातापाची वेळ ओढवणार नाही म्हणून आत्ताच लक्ष द्या आणि आपल्या उरावर दुसरा लोकप्रतिनिधी घेण्यापेक्षा आपल्या हाकेला धावून येणारी हक्काची माणसे निवडून द्या असे आवाहन विचारे यांनी मतदारांना केले. या प्रचार रॅलीत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक व नागरिकाने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रभागाची झाली दुर्दशा*

संत ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, वैतीवडी, हाजुरी आदी परिसर प्रभाग क्रमांक १३ मध्ये येतो. या प्रभागात अस्वच्छता, खोदलेले रस्ते, लटकलेल्या वीज वाहिन्या, संत ज्ञानेश्वर नगरच्या तोंडावर असलेले कचऱ्याचे ढीग आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रभागाची दुर्दशा झाली असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. प्रभाग क्रमांक १३ विकास ही खुंटला असल्याने यंदा बदल करण्याची इच्छा मतदारांनी व्यक्त केली आहे..

*आपला माणूस, सामान्य माणूस टॅगलाईन गाजली*

एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि नागरिकांशी नाळ जोडलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शहाजी खुस्पे कडवी टक्कर देत आहेत. गेल्या ५ वर्षापासून त्यांनी प्रत्येकाच्या सुखात दुःखात मदत केली आहे. त्यामुळे शहाजी खूस्पे

यांची आपला माणूस, सामान्य माणूस अशी ओळख निर्माण झाली आहे. सध्या ही टॅगलाईन गाजली असून प्रचाराचा मुद्दाच बनली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande