
अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.)।
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत आयोगाच्या स्पष्ट निर्दे शांकडे दुर्लक्ष करत तब्बल १८५ उमेदवारानी प्रचार खर्चाचे विवरणपत्र सादरच केलेले नाही. सात झोन कार्यालयांतर्गत २२ विभागांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत एकूण ६६१ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी केवळ ४७६ उमेदवारांनी (७२.१ टक्के) खर्चाचा हिशेब प्रशासनाकडे दिला आहे.
दररोजचा प्रचार खर्च सादर करणे बंधनकारक असतानाही मोठ्या संख्येने उमेदवारांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. या गंभीर बाबीची दखल घेत महानगरपालिका प्रशासन कडक कारवाईच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळाले आहेत. खर्चाचे विवरण नियमित न देणाऱ्या उमेदवारांना कारणेदर्शक नोटीस बजावण्यात येणार असून, गरज पडल्यास निवडणूक नियमांनुसार पुढील कारवाईही केली जाऊ शकते. प्रत्येक झोन कार्यालयात खर्च तपासणी रजिस्टर ठेवण्यात आले असून, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. मात्र तरीही अनेक उमेदवारांनी खर्च शून्य दाखवणे किंवा विवरणच न देणे हे संशयास्पद असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.
सात झोनमध्ये ६६१ उमेदवार
रामपुरी कॅम्प, नवीन तहसील, राजापेठ, दस्तूरनगर, अंबापेठ, जुनी तहसील आणि बडनेरा या सातही झोन कार्यालयांत निवडणूक कामकाज सुरू असून, सर्व उमेदवारांना अंतिम इशारा देण्यात आला आहे. दैनिक खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केल्यास कारवाई अटळ असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी