
तिरुवनंतपुरम, 11 जानेवारी (हिं.स.)। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार राहुल ममकूटथिल यांना शनिवारी उशिरा रात्री केरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ममकूटथिल हे पलक्कड येथून आमदार आहेत. मागील वर्षी ४ डिसेंबर रोजी केरळ काँग्रेसने त्यांना पक्षातून काढून टाकले होते.
पोलिसांनी सकाळी माहिती दिली की राहुल ममकूटथिल यांना शनिवारी मध्यरात्री पलक्कड येथून एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या मते, पथानामथिट्टा जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर पलक्कडच्या या आमदाराविरुद्ध नुकतेच तिसरे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. विशेष तपास पथक त्यांच्या विरोधातील दोन अन्य प्रकरणांचीही चौकशी करत आहे आणि या नव्या प्रकरणाची चौकशीदेखील त्याच पथकाला सोपवण्यात आली आहे.
ममकूटथिल हे पलक्कडमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथून त्यांना मध्यरात्री ताब्यात घेऊन पथानामथिट्टा येथे आणण्यात आले. पोलिसांनी सांगितले की त्यांचा औपचारिक अटक मेमो नंतर नोंदविला जाईल. उल्लेखनीय म्हणजे, केरळ उच्च न्यायालयाने पहिल्या प्रकरणात ममकूटथिल यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. हे प्रकरण बलात्कार आणि एका महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. दुसऱ्या प्रकरणात तिरुवनंतपुरम सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. या आरोपांनंतर केरळ प्रदेश काँग्रेस समितीने ममकूटथिल यांना पक्षातून निलंबित केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule