
- हे मोदींचे बँडवाले, ब्रांड आमचाच - शिवाजी पार्कवर 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र
मुंबई, 11 जानेवारी (हिं.स.) - युती, आघाडी होते, लोक येतात, दूर जातात हे सगळं घडतं. पण हिंदुत्ववादी असलेली शिवसेना का नको हे आम्हाला कळतं. मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू चालतात, इतर लोक चालतात. पण शिवसेना नकोय कारण ती आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबई गिळता येणार नाही, म्हणून तुम्हाला शिवसेना नको. अरे तुम्ही मोदींचे बँडवाले आहात, आमचा ब्रांड कसा काय संपवणार? ठाकरे आम्ही एकच आहोत आणि शरद पवारही आमच्या बरोबर आहेत. ठाकरे आणि पवार ही दोन नावं पुसायची हा यांचा डाव आहे, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित उबाठा-मनसे-राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उबाठा, मनसे आणि शरद पवार गटाचे प्रमुखे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत. इतकं पोटतिडकीने बोलल्यानंतर डोक्यात तिडीक गेली पाहीजे. ती जाणार नसेल तर जय भवानी, जय शिवाजी बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. पहिल्या सभेला मी देखील होतो. आज आमच्या खांद्यावर धुरा आलीय. ठाकरे बंधु एकत्र का आले हे आज सर्वांना कळाले असेल. भावकी एकत्र आलेयत, आता गावकी एकत्र येतेय. अस्तित्वासाठी ठाकरे एकत्र आलेयत, असे ते म्हणतात. पण समोर बसलेले ठाकरेंचं अस्तित्व आहेत. हिंदु-मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सर्व मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो, असे आव्हान ठाकरे देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राचे दालन आम्ही उभं केलंय. त्याची यांनी आता दुरावस्था केलीय. चळवळीत जनसंघ कुठेच नव्हता. या लढ्यात शाहीर अमरशेख हा मराठी मुसलमान देखील होता. दो कौडी के मोल मराठा बिकने को नही, असे छाती ठोकून दिल्लीकरांना सांगायचा, याची आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.
90 टक्के मुंबई यांनी खोदून ठेवलीय. आपण जगायचं कसं हे सांगणारी ही मुंबई आहे. संपूर्ण मुंबईत धूळ, सिमेंटचं साम्राज्य आहे. यातील 50-60 टक्के सिमेंट अदानींच्या कंपनीतलं आहे. मराठी माणसाने केवळ घाम गाळून नव्हे तर रक्त सांडून मुंबई मिळवलीय. आम्ही घराणे म्हणून हे आक्रमण परतवत आहोत. मुंबईचा घास गिळता येणार नाही म्हणून तुम्हाला शिवसेना नकोय. आज ठाकरे आम्ही आहोत पण शरद पवारदेखील आमच्यासोबत आहे. हे संपले की मराठी माणूस उभा राहू शकणार नाही. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केली नाही. हिसकवण्यासाठी युती नाही. आमच्याच घरात येऊन आवाज उठवतात, त्यांच्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय. मराठी माणसाला दुहीचा श्राप आहे. मी भाजपच्या ढोंगावर लाथ मारतोय. भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे. भाजपच्या मनातील काळं अण्णामलाई बोलून गेला. आम्हाला पालिका का पाहिजे हे आम्ही सांगतोय. पण यांना पालिका हवीय कारण यांना ती अदानींच्या घशात घालायचीय, अशी टीकाही ठाकरेंनी केली.
संयुक्त महाराष्ट्राच्य लढ्यात आमचे आजोबा होते. ही आमची घराणेशाही आहे. आमच्या डोळ्यादेखत भाषेचे लचके तोडत असताना ही प्रबोधनकारांची नातवंड आम्ही घरात शेपट्या घालून बसणार नाही. मराठीसाठी एकत्र आलोय. आमच्यात वाद नव्हतेच. आम्ही मराठीसाठी एकत्र आलोय, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी