
नाशिक, 11 जानेवारी (हिं.स.)।
- नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विकासकामे, धार्मिक-सांस्कृतिक वारसा, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर भूमिका मांडली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी प्रभू श्रीरामाला नमन करत, “नाशिकला येऊन रामाचे स्मरण न करणारे काहीजण केवळ निवडणूक पर्यटनासाठी येतात,” असा टोला विरोधकांना लगावला.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोदा घाटावर रविवारी ( दि.११) आयोजित भव्य सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे, सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे शहराध्यक्ष सुनील केदार , सरचिटणीस सुनील देसाई , यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, “जो रामाचा नाही, तो कामाचा नाही. काही लोक देवाची खिल्ली उडवतात. त्यांच्याबद्दल फार बोलणार नाही, पण नाशिकशी माझे नाते कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील.कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मागील कुंभमेळा राज्य सरकारच्या मदतीने निर्विघ्न पार पडला आणि एकाही भाविकाचा मृत्यू झाला नाही. “कुंभ हा केवळ उत्सव नसून आपल्या संस्कृतीचे दर्शन आहे. कितीही लोकांनी टीका केली तरी कुंभ बंद पडणार नाही. अकबराने कुंभ सुरू केला, हा दावा त्यांनी ठामपणे फेटाळला. गंगापूर धरणातून नवीन पाईपलाईन, ४७ टाक्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे. गोदावरी स्वच्छतेसाठी पहिल्या टप्प्यात १ हजार कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात दीड हजार कोटी रुपये खर्च केले जातील.“राज ठाकरे यांना अंघोळ आणि पिण्यास योग्य असे गोदावरीचे पाणी देऊ,” असे आश्वासनही त्यांनी दिले. एसटीपी प्रकल्पांसाठी ऍन्युइटी पद्धतीने पैसे देण्यात येतील.नाशिकमध्ये ४ हजार कॅमेरे बसवून ‘शंकराचा तिसरा डोळा’ दिला जाणार असून, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांवर कडक नजर ठेवली जाईल. स्वतःची फायबर नेटवर्क उभारून शहर अधिक सुरक्षित केले जाईल.नाशिकमध्ये ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचे सांगत, जिंदाल, रिलायन्स, महिंद्रा, क्रॉम्प्टन यांसारख्या कंपन्यांची नावे त्यांनी घेतली. एच ए एल मध्ये विमाननिर्मिती, एअरफोर्स प्रकल्प, नव्या एम आय डी सी आणि एकूण ५० हजार कोटींची गुंतवणूक पाइपलाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
देवाभाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असे ठामपणे फडणवीस यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले.शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन करत, “भाजपचे कमळ ओळखीचे आहे. एकहाती सत्ता द्या, पुढील पाच वर्षे नाशिकची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ,” अशी साद त्यांनी घातली.
साधुग्राम आणि वृक्षतोड वादसाधुग्राम प्रकल्पावर डाव्या विचारसरणीच्या लोकांनी गैरसमज पसरवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. “आमच्या सत्तेत वृक्षतोड नव्हे, तर वृक्षारोपण झाले. उच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपने ६६ नगरसेवक निवडून आणले होते. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यावेळीही मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मागील कुंभवेळी ६ हजार कोटींचा निधी होता, तर यावेळी तब्बल ३० हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. यामध्ये रिंगरोड, एसटीपी प्लांट, रामकालपथ, द्वारका व इंदिरानगर बोगदा यांचा समावेश आहे.मंत्री गिरीश महाजन
श्रीरामाच्या विचारांवर चालणारा भाजप पक्ष असून नाशिक हे नाव शूर्पणखेचे नाक कापले गेले त्या घटनेवरून पडले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. नाशिकच्या विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांना छाटण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपले असताना महापौरही भाजपचाच असला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “लाडक्या बहिणींनो, सकाळी उठा, देवपूजा करा, नाश्ता करून ठेवा, झाकून ठेवा. आधी कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण द्यावे. मंत्री पंकजा मुंडे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV