
मुंबई, ११ जानेवारी (हिं.स.) : मुंबई विकत घेता येत नाही, तर पैसे टाकून जमीन विकत घेत आहेत. एकीकडे आपल्यात, जाती-जातीजातीत भांडणं लावली जात आहेत. गुजरातला मुंबईशी जोडण्यासाठी दीर्घकाळापासून नियोजन सुरू आहे. संकट तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, तुम्हाला कधी बाहेर काढतील हे कळणारही नाही. अशा परिस्थितीत ही निवडणूक होत आहे. आता ही शेवटची संधी आहे. आता चुकला तर सर्वच गमावाल. मराठी माणसांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एक व्हावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांसह राज्यभरातील नागरिकांना केले. मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित उबाठा-मनसे-राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उबाठा, मनसे आणि शरद पवार गटाचे प्रमुखे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
वाढवण बंदराला लागून लगेच गुजरात आहे. मुंबई गुजरातला न्यायची, हे दीर्घकाळापासूनचे नियोजन आहे. त्यासाठी आधी पालघर ताब्यात घेतलं जातंय. वाढवण ताब्यात घेतलं जातंय. नंतर ते मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत. हे सर्व मुंबईला कसं जोडलं जाईल याचा दीर्घकाळपासून नियोजन सुरु आहे. आम्ही बेसावध आहोत. आपल्यात जाती जातीत भांडणं लावले जात आहेत. मात्र महापालिका आपल्या ताब्यात असेल तर ते काहीही करू शकत नाहीत. महापालिका आपल्या ताब्यात असेल तर ते अदानीला जमीन देऊ शकत नाहीत, असा दावाही राज ठाकरे यांनी केला. तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जातोय. तुमची जमीन आणि भाषा संपली की तुम्ही संपलात. हेच त्यांना संपवायचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळीही असेच संकट होते. मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो याचे कारण म्हणजे मुंबईवर आलेले संकट होते. हिंदी सक्ती विरोधात आम्ही एकत्र आलो. कोणत्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हाच आम्ही एकत्र येण्याचा मूळ विचार होता, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. पुन्हा एकदा मुंबई आणि मराठी माणसांसाठी आम्ही दोन भावांनी उभारलेला लढा बाळासाहेब ठाकरे वरून पाहत असतील, असे म्हणत राज ठाकरे भावूक झाले. मी २० वर्षांनंतर प्रथमच कोणत्या तरी पक्षाबरोबर युती करत आहे. मात्र युती केल्यानंतर अनेकजण नाराज झाले. त्यांना दुखावणे आमचा हेतू नव्हता. ते नाराज झाले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
२०२४ विधानसभा निवडणुकीनंतर सरकार वाटेल ते निर्णय घेऊ लागले. काँग्रेसही सत्तेत होती, पण तेव्हा सरकार जनतेला घाबरायचे. आता पैसे फेकल्यावर आम्ही सर्वांना विकत घेऊ, अशी हिंमत सरकारमध्ये कशी आली, असा सवालही त्यांनी केला. ६६ उमेदवारांना बिनविरोध करून मतदारांचा हक्क हिरावला. बलात्काराचा आरोप असलेल्या माणसाला भाजपने नगरसेवक केले, तुळजापूरमध्ये ड्रग्स विकणाऱ्याला उमेदवारी दिली. ही हिंमत कोठून आली? वेड्या-वाकड्या पद्धतीने निवडणूक जिंकल्यावर असा माज येतो. अख्खी मुंबई विकायला काढली आहे, असा आरोपही त्यांनी केला. २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर मला एक व्यक्ती भेटली. त्याने मला माहिती दिली की, ते आज मी तुम्हाला येथे दाखविणार आहे. आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला भीती न वाटली तर या देशात निवडणुका न लढलेल्याच बऱ्या. २०१४ मधील भारताचा नकाशा दाखवत राज ठाकरे म्हणाले की, अदानी मोदी पंतप्रधान होण्याआधी कोठे होते, आता ते कोठे आहेत, याचा नकाशाच राज ठाकरेंनी सादर केला. या देशात अनेक उद्योगपती असताना केवळ अदानी यांच्यावर दहा वर्षांत एवढी मेहरबानी कशी होते? एकाच माणसाला सर्व सवलती कशा मिळतात?
गौतम अदानी सिमेंट उद्योगात कधीच नव्हते. आज देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट उत्पादक कंपनी ही अदानी यांची आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. २०१४ मध्ये अदानी यांचे महाराष्ट्रात केवळ एकच उद्योग प्रकल्प होता. आज महाराष्ट्रात अदानी यांचे उद्योगांचे जाळे पसरले आहे. यावेळी त्यांनी २०१८ ते २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात अदानी यांना कोणते प्रकल्प मिळाले, याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली. तसेच मुंबई विमानतळाची जागा विकण्याचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी