
नाशिक, ११ जानेवारी (हिं.स.) : आज मी नाशिकमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा प्रभु श्रीरामाला नमन करतो. श्रीरामांच्या चरणी मी नतमस्तक होतोय. पण, काल दोन भाऊ नाशिकमध्ये येऊन गेले. पण, त्यांना रामाची आठवण झाली नाही. आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ठाकरे बंधूंवर केली.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरू असून दोन दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंची सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेते पदाच्या काळात देखील आम्ही काम केले. ज्यावेळी कोविडचा काळ होता त्यावेळी उबाठा, मनसे, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते. त्यावेळी हा देवाभाऊ नाशिकमध्ये आला होता. प्रत्येक कोविड केअर सेंटर आणि आयसीयूपर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता. पण, मला तुम्हाला विचारचं आहे. तुम्ही कितीवेळा नाशिकला आले. मी वर्षातून चारवेळा येतो. निवडणूक आली की नाशिकला यायचे आणि निवडणुका झाल्या की नाशिकला विसरायचे. हे निवडणूक पर्यटक आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी