धामणगाव रेल्वे परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
अमरावती, 11 जानेवारी, (हिं.स.)। धामणगाव रेल्वे येथील कृष्णानगर व आसपासच्या काही भागांमध्ये आज भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घर हलल्यासारखे वाटल्याने अनेक नागरिक काही क्षणांसाठी घाबरले. हा धक्का अल्पकालीन असल्याचे नाग
धामणगाव रेल्वे परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का


अमरावती, 11 जानेवारी, (हिं.स.)।

धामणगाव रेल्वे येथील कृष्णानगर व आसपासच्या काही भागांमध्ये आज भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घर हलल्यासारखे वाटल्याने अनेक नागरिक काही क्षणांसाठी घाबरले. हा धक्का अल्पकालीन असल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. अनेक नागरिकांनी भूकंपासारखे धक्के जाणवल्याचे सांगितले असले, तरी परिस्थिती लवकरच पूर्ववत झाली. प्रशासनाकडूनही कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भात प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते अक्षय जोशी यांनी सांगितले, हा भूकंपाचा सौम्य व क्षणिक धक्का होता. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कृष्णा नगर येथील एका रहिवाशाने सांगितले, क्षणभर घर हलल्यासारखे वाटले आणि आम्ही घाबरलो, पण काही नुकसान झालेले नाही.

भारतीय भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण विभागातील वेधशाळेच्या जीपीएस, सेस्मोग्राफवर भूकंप झाल्याची नोंद नाही. घडलेली घटना इतर कारणांनी होऊ शकते. त्यामुळे सदर विषयात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

अभय घोरपडे, तहसीलदार

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande