
नवी दिल्ली, 11 जानेवारी (हिं.स.)। भारतीय नौदल पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे नवीन नौदल तळ उभारणार असून यामुळे बंगालच्या उपसागरात भारताची सागरी उपस्थिती आणि सुरक्षात्मक क्षमता मोठ्या प्रमाणात बळकट होणार आहे. संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, चीनच्या वाढत्या नौदल हालचाली, बांगलादेश आणि पाकिस्तानशी संबंधित बदलती प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा तळ पूर्ण नौदल कमांड नसून “नेव्हल डिटॅचमेंट” म्हणून कार्य करणार आहे आणि येथून लहान युद्धनौका तसेच हायस्पीड बोटी तैनात करण्यात येणार आहेत, ज्यामुळे सागरी पाळत व त्वरित कारवाईची क्षमता वाढेल.
हल्दिया डॉक कॉम्प्लेक्सचा वापर करून हा तळ उभारला जाणार असल्यामुळे अल्प अतिरिक्त पायाभूत सुविधांसह तो लवकर कार्यान्वित करता येणार आहे. सुरुवातीला स्वतंत्र जेट्टी आणि आवश्यक किनारपट्टीवरील सहाय्यक सुविधा उभारल्या जातील. या तळावर सुमारे 100 अधिकारी आणि खलाशी तैनात होणार असून त्यातून हा तळ आकाराने लहान असला तरी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट होते. हल्दिया कोलकातापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असून थेट बंगालच्या उपसागरात प्रवेश मिळत असल्याने हुगळी नदीमार्गे होणारा वेळेचा अपव्ययही टाळला जाईल.
या तळावर फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट (FIC) आणि 300 टन वजनाच्या न्यू वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट (NWJFAC) तैनात करण्याची योजना असून या नौका 40 ते 45 नॉट्स म्हणजेच सुमारे 80 किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. या नौकांवर 10 ते 12 जवान कार्यरत राहू शकतात आणि किनारी गस्त, घुसखोरी रोखणे, बंदर सुरक्षा तसेच विशेष मोहिमांसाठी त्यांचा वापर होणार आहे. या नौकांना CRN-91 तोफा बसवण्यात येणार असून नागास्त्रसारख्या लोइटरिंग म्युनिशन्स सिस्टीम बसवण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे अचूक हल्ला आणि पाळत क्षमता वाढेल.
हा उपक्रम नौदलाच्या व्यापक विस्तार कार्यक्रमाचा एक भाग असून 2024 मध्ये झालेल्या डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिलच्या बैठकीत 120 फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट आणि 31 NWJFAC खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. पूर्वेकडील किनारपट्टीवर विशाखापट्टणममधील ईस्टर्न नेव्हल कमांड आणि अंदमान-निकोबार बेटांवरील प्रमुख तळांसोबत आता हल्दियाचा समावेश महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर बंगालच्या उपसागरातील उथळ पाणी, दाट सागरी वाहतूक, बांगलादेश सीमेजवळील सुरक्षा आव्हाने आणि भारतीय महासागर परिसरात वाढती चीनी नौदल उपस्थिती या पार्श्वभूमीवर हल्दिया ही रणनीतीदृष्ट्या योग्य निवड ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या तळाच्या स्थापनेमुळे किनारी सुरक्षेपासून ते द्रुत प्रतिसाद कारवाईपर्यंत भारतीय नौदलाची क्षमता उल्लेखनीयरीत्या वाढणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule