
मुंबई, 11 जानेवारी (हिं.स.)। राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर संशयास्पद बेवारस बॅग आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. बॅग दिसताच माहिती पोलिसांना देण्यात आली आणि तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवला असून बॅगेची तपासणी सुरू आहे. बॅगेत नेमके काय आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. ही बॅग नेमकी कुणाची आहे, ती तेथे कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आली याचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
हा प्रकार निष्काळजीपणाचा आहे की घातपाताचा प्रयत्न, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे. अनेक वर्षांपासून नितेश राणे आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखले जातात आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर सापडलेली संशयास्पद बॅग अधिकच चर्चेला कारणीभूत ठरली असून पोलिसांचा तपास काय निष्कर्ष देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule