
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)।महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवाद पुणेकरांशी या कार्यक्रमात अभिनेत्री गिरीजा ओक हिने मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढता येणार नाही हे आधीच लक्षात आलं होतं असंही त्यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवड, पुण्यात जिथं जिथं आपण लढतोय तिथं मैत्रीपूर्ण लढती असल्याचं समजूया असं मी म्हटलं होतं. आतापर्यंत मी संयम पाळलाय पण त्यांचा संयम ढळलाय. निवडणुकीतली स्थिती पाहून कदाचित दादांचा संयम कमी झाला असावा. १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणतंही कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. राज ठाकरेंनी याचं क्रेडिट मला दिलं याचा आनंद वाटतो. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की दोघे एकत्र यावेत. ते एकत्र येत असतील तर आनंदच आहे आणि त्याचा आशीर्वाद मलाच मिळेल. बहीण-भाऊ एकत्र आलेत का याचा मला अंदाज नाही असं म्हणत पवार कुटुंबाबाबत फडणवीस यांनी बोलणं टाळलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु