
नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.): नाशिकमध्ये ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासकामांतून सुदृढ प्रतिसाद दिला. नाशिकमध्ये ५७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा त्यांनी केली, ज्यामध्ये शहराच्या पायाभूत सुविधा, रस्ते, जलपुरवठा आणि सुरक्षा यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नाशिकचा भविष्यातील विकास आणि गुंतवणुकीच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत. सिंहस्थबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “सिंहस्थ केवळ उत्सव नाही, तर आपली संस्कृती आहे.” त्यांनी ठणकावून सांगितले की, कितीही डाव्या विचारांच्या किंवा नास्तिकांनी टीका केली तरी सिंहस्थ कधीही थांबणार नाही.
गंगापूर धरणातून नवीन पाईपलाइन आणि ४७ टाक्यांद्वारे पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरच सुटेल. गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी पहिल्या टप्प्यात एक हजार कोटी आणि दुसर्या टप्प्यात दीड हजार कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच, राज ठाकरेंना गोदावरीमध्ये डुबकी मारता येईल एवढे स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाईल.
राज ठाकरे-गिरीश महाजन वाद
गेल्या ९ जानेवारी रोजी झालेल्या सभेत, राज ठाकरेंनी तपोवनातील वृक्षतोडीवर टीका केली होती. त्यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, त्यांनी २० हजार झाडे लावून त्यांचे संगोपन केले असून, केवळ टीआरपीसाठी आरोप केले जात आहेत. महाजन म्हणाले की, “राज ठाकरेंनी मला ‘लाकूडतोड्या’ म्हटले. मुख्यमंत्री फडणवीस यांनाही त्यांनी टीका केली होती.”
सुरक्षा व तंत्रज्ञान
नाशिकच्या सुरक्षेसाठी शहरात चार हजार CCTV कॅमेरे बसविण्यात येणार असून, AI तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांवर नजर ठेवली जाईल. स्वतःची फायबर नेटवर्क उभारून शहर अधिक सुरक्षित होईल.
उद्योग व गुंतवणूक
मुख्यमंत्री म्हणाले की, जिंदाल, रिलायन्स, महिंद्रा, क्रॉम्प्टन यांसारख्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. भविष्यात HAL विमाननिर्मिती प्रकल्प, एअरफोर्स प्रकल्प, 1000 एकरवर नवीन MIDC आणि एकूण ५० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प नाशिकमध्ये राबविण्यात येणार आहेत.
प्रस्तावित विकासकामे आणि खर्च
• डहाणू–संभाजीनगर रस्ता काँक्रिटीकरण व नवीन पालखी मार्ग – ३५० कोटी
• चिंचोली–पांडुर्ली रस्ता सुधारणा – २०७.९५ कोटी
• वाडीवर्हे–नागलवाडी रस्ता सुधारणा व रुंदीकरण – २०० कोटी
• नाशिक रिंगरोड – ११९ कोटी
• ढकांबे–जऊळके रस्ता – १६३ कोटी
• त्र्यंबकेश्वर–पिंपळगाव रस्ता सुधारणा – २१५ कोटी
• पेठ–त्रंबकेश्वर–घोटी रस्ता सुधारणा व रुंदीकरण – २०५ कोटी
• शिर्डी–राहता रस्ता – १६५ कोटी
• नाशिक–वणी–नांदूरी रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण – १०० कोटी
• आडगाव–ओझरखेड रस्ता सुधारणा व रुंदीकरण – १५७ कोटी
• मुकणे धरण–नाशिक पाणीपुरवठा – ३७१ कोटी
• अमृत योजना अंतर्गत नाशिक शहर पाणीपुरवठा – ३०५ कोटी
• नाशिक शहरातील STP प्रकल्प – १,४७५ कोटी
• नाशिक शहरात CCTV कॅमेरे – ३५२ कोटी
• पंचवटी रामकाल पथ विकास – ८५ कोटी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सभेत नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना सादर केल्या असून, शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि पर्यावरण यांचा समावेश करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV