छत्रपती संभाजीनगरात पैसे वाटप करण्याची यादी समाज माध्यमांवर व्हायरल
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आज (१३ जानेवारी) प्रचाराची सांगता झाली आहे. तत्पूर्वी प्रचार रॅली, सभांना वेग आला आहे तसेच पडद्यामागूनही ब-याच हालचा
छत्रपती संभाजीनगरात पैसे वाटप करण्याची यादी समाज माध्यमांवर व्हायरल


छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आज (१३ जानेवारी) प्रचाराची सांगता झाली आहे. तत्पूर्वी प्रचार रॅली, सभांना वेग आला आहे तसेच पडद्यामागूनही ब-याच हालचाली सुरू आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील एक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. ही घटना आहे पैसे वाटप करण्याच्या यादीची. ही यादी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे या परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. त्यांनी संबंधिताला जाब विचारलाच शिवाय व्हायरल केलेल्या यादीचे बॅनर बनवून त्यांच्या परिसरात लावले आहेत.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आज संपली तत्पूर्वी येथील बेगमपुरा भागात विचित्र घटना घडली. या भागातील रहिवाशांच्या यादीचे बॅनर परिसरात लागल्याने चर्चेला उधाण आले. मात्र, ही यादी ज्यांना पैसे वाटप करायचे आहेत, त्यांची असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. एका व्यक्तीने ही त्याच्याकडील यादी असून यांना पैसे द्यायचे आहेत, अशी यादी समाज माध्यमावर व्हायरल केली. या यादीने बेगमपुरा भागातील मतदार संतप्त झाले. आम्ही कुणीही पैसे मागितले नाहीत, घेतले नाहीत तरीही आमची नावे या यादीत कुणी व्हायरल केली, असा प्रश्न त्यांना पडला.

अखेर या यादीचे फोटो ज्या फरशीवर ठेवून काढले स्थानिकांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला. त्याला याचा जाब विचारला. त्यानंतर त्या व्यक्तीने सपशेल माघार घेत माफी मागितली. रहिवाशांनी या यादीचे बॅनर बनवून लावले आहेत. या यादीतील व्यक्तींच्या नावाने कुणीही पैसे मागू नये तसेच देऊ नये आणि मतदार पैसे घेऊन मतदान करतात हा डाग त्यांच्यावर लागू नये ही काळजी बेगमपुरा भागातील रहिवाशांनी घेतली.

या प्रकरणातून एक बाब स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे मतदार पैसे मागतात किंवा मतदानासाठी पैसे घेतात, असा समज पसरवण्याचा प्रयत्न करून कुणीतरी राजकीय पक्षाकडून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, बेगमपुरामधील रहिवाशांनी हा प्रयत्न हाणून पाडून संबंधित व्यक्तीला याचा जाब विचारला आहे. या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली की नाही, हे कळले नाही. मात्र, लोकांच्या एकजुटीमुळे त्यांच्या बदनामीचा प्रकार अयशस्वी ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande