
अहमदपूर ग्रामीण रुग्णालय 'मरणकळा' सोसतेय का?
लातूर, 13 जानेवारी (हिं.स.)। अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभाराने आता कळस गाठला आहे. गरीब आणि सामान्य रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे हे रुग्णालय सध्या मृत्यूचे सापळा बनत चालले आहे की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अवघ्या एका महिन्याच्या अंतरात दोन महिलांचा उपचारादरम्यान आणि हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या निगरगट्टपणावर संताप व्यक्त होत आहे.
चालत आलेल्या महिलेचा मृत्यू; सलगरा ग्रामस्थांचा आरोप
सिंधूताई येमले (वय ३८, रा. सलगरा) यांच्या बाबतीत घडली आहे. १२ जानेवारी रोजी त्यांना उलट्या आणि जुलाब होत असल्याने नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात आणले. विशेष म्हणजे, सिंधूताई बस स्थानकापासून स्वतःच्या पायाने चालत दवाखान्यात आल्या होत्या. मात्र, दाखल केल्यानंतर काही तासांतच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जी महिला चालत दवाखान्यात येते, तिचा मृत्यू इतक्या तातडीने कसा होऊ शकतो? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी विचारला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप केला आहे.
महिनाभरापूर्वीच दिपाली वाघमारे यांचा झाला होता मृत्यू
ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदारपणाची ही पहिली वेळ नाही. अवघ्या महिनाभरापूर्वी, १६ डिसेंबर २०२५ रोजी दिपाली दयानंद वाघमारे (वय २३, रा. धानोरा खुर्द) या नवविवाहितेचा पहिल्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला होता. गंभीर प्रकृती असतानाही योग्य व्यवस्थापन न झाल्याने त्यांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून 'माता मृत्यू अन्वेषण समिती' चौकशी करत असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, ही चौकशी सुरू असतानाच सिंधूताईंचा मृत्यू झाल्याने समितीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारींचा पाढा आणि प्रशासनाचे 'बेंबीच्या देठापासून' मौन
अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसणे, रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणे आणि आपत्कालीन स्थितीत समन्वयाचा अभाव असणे अशा तक्रारींची मोठी यादी आहे. नुकत्याच झालेल्या एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीच्या निधनावेळीही खासगी दवाखाने बंद असताना त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले होते, मात्र तेथील सुविधांबाबत नागरिकांमध्ये साशंकता कायम होती.
नेमकी चूक कोणाची?
प्रकरण १: दिपाली वाघमारे (बाळंतपणातील दुर्लक्ष) - १६ डिसेंबर.
प्रकरण २: सिंधूताई येमले (सामान्य आजारात मृत्यू) - १२ जानेवारी.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी चौकशीनंतर सत्य समोर येईल असे उत्तर दिले आहे. मात्र, चौकशीच्या नावाखाली दोषींना पाठीशी घातले जात असल्याची भावना आता अहमदपूर तालुक्यात पसरत आहे.
आंदोलनाचा इशारा:
एकामागून एक महिलांचे बळी जात असताना प्रशासन सुस्त आहे. जर सखोल चौकशी करून संबंधित दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले नाहीत, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा धानोरा आणि सलगरा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis