फळपीक विमा नुकसानभरपाईची प्रतीक्षा संपली; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार रक्कम
रायगड, 13 जानेवारी (हिं.स.) – रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जागतिक हवामान बदलामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतरही अडकलेली आंबा फळपीक विम्याची नुकसानभरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणा
हजारो आंबा उत्पादकांना मोठा दिलासा


रायगड, 13 जानेवारी (हिं.स.) – रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जागतिक हवामान बदलामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतरही अडकलेली आंबा फळपीक विम्याची नुकसानभरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, येत्या दोन दिवसांत उर्वरित रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन विमा कंपनीकडून देण्यात आले आहे.

राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या सातत्यपूर्ण आणि परिणामकारक पाठपुराव्यामुळे हा मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. रायगड जिल्हा कोकणातील आंबा उत्पादनाचा प्रमुख केंद्र मानला जातो; मात्र अवकाळी पाऊस, तापमानातील तीव्र बदल आणि किड–रोगांचा प्रादुर्भाव यामुळे हजारो बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

शासनाच्या आंबा फळपीक विमा योजनेत सहभागी होऊनही अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरपाई मिळत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला होता. ही गंभीर परिस्थिती चंद्रकांत मोकल यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या निदर्शनास आणली आणि विविध प्रशासकीय बैठका घेऊन शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली.

जिल्ह्यातील एकूण ५,२३५ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ३,९८१ हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतले होते, आणि सुमारे ७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. यापैकी जवळपास ५ कोटी रुपये डिसेंबर अखेरपर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते, मात्र रोहा, तळा, पनवेल व खालापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही विमा रकमेपासून वंचित होते.

अखेर हा प्रश्न राज्य पातळीवर नेण्यात आला. चंद्रकांत मोकल यांनी राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांना सविस्तर पत्र दिले आणि परिस्थिती स्पष्ट केली. त्यानंतर कृषी आयुक्तांनी मुख्य सांख्यिकी अधिकारी प्रमोद सावंत यांना विमा भरपाई त्वरित देण्याचे आदेश दिले, ज्यामुळे विमा कंपनीने कार्यवाहीला गती दिली.

विमा कंपनीने दोन दिवसांत उर्वरित सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले, असे चंद्रकांत मोकल यांनी सांगितले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी हंगामासाठी बागायतदार नव्या आशेने सज्ज होत आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande