
नांदेड, 13 जानेवारी (हिं.स.)। गेल्या चार दिवसापासून हवामानात बदल झाला आहे. सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने परिसरात सध्या आंब्याच्या झाडांना फुलांचा मोहर आला आहे. यंदा तरी गावरान आंब्याचा गोडवा सर्वसामान्य नागरिकांना चाखावयास मिळेल, अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची निराशा झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळे त्यापासून मिळणारे यंदाचे उत्पादन निश्चितच घटणार असल्याचे मत जाणकारांमधुन व्यक्त होत आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून गावरान आंब्याचा गोडवा कमी होत चालला होता. कारण बदलत्या वातावरणाचा व अवकाळी पावसाचा फटका वेळोवेळी आंब्यांना मोहर आल्याच्या नंतर किंवा फळ धारणेच्या वेळेस बसू लागला. त्यामुळे परिसरात आंबा पिकापासून मिळणारे उत्पादन कमी होऊ लागले. रसाचा आंबा बाजारपेठेत दुर्मिळ होऊ लागला आहे. इतर हापूस, केसर आदी सुधारित वाण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असले तरीही त्यांचा गोडवा चाखणे मात्र खिशाला परवडणारा असला तरीही गावरान आंब्याचा महिमा काही वेगळाच असल्याचे बोलल्या जाते.
परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात मोहर येण्यास सुरुवात झाली असून गेल्या चार दिवसापासून वातावरणात अमुलाग्र बदल होऊन कडाक्याच्या थंडीत ढगाळ वातावरण निर्माण झाली. त्यामुळे आंबा पिकांचा मोहोर अक्षरशः गळून जात असल्याची चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे यंदा गावरान आंब्यापासून मिळणाऱ्या उत्पादनात निश्चितच घट होईल व गावरान आंब्याचा गोडवा महागणार, असे दिसते
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis