न्या. मार्कंडेयवारांच्या टपाल संग्रहाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
नागपूर , 13 जानेवारी (हिं.स.) : देशभरातील तब्बल 761 गावांतील पत्र संग्रह संकलित करून एक अनोखा विक्रम साधल्याबद्दल नागपूर येथील अधिवक्ता आणि सेवानिवृत्त न्यायाधीश प्रभाकर आत्माराम मार्कंडेयवार यांचा वैयक्तिक टपाल संग्रह महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सम
न्या. प्रभाकर मार्कंडेयवार


नागपूर , 13 जानेवारी (हिं.स.) : देशभरातील तब्बल 761 गावांतील पत्र संग्रह संकलित करून एक अनोखा विक्रम साधल्याबद्दल नागपूर येथील अधिवक्ता आणि सेवानिवृत्त न्यायाधीश प्रभाकर आत्माराम मार्कंडेयवार यांचा वैयक्तिक टपाल संग्रह महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आला आहे.

न्या. मार्कंडेयवार यांनी त्यांच्या संग्रहात देशभरातील 700 हून अधिक टपाल कार्यालयांमधून आलेले पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रे, लिफाफे आणि टपाल स्टेशनरी संकलित केली आहे. या संग्रहात कोणत्याही पोस्ट ऑफिसची पुनरावृत्ती नाही, म्हणजे प्रत्येक वस्तू अनन्य आहे. संकलित वस्तूंवर विशिष्ट टपाल कार्यालयाचे शिक्का किंवा कॅन्सलेशन चिन्ह असते, ज्यामुळे त्या ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठरतात. हळूहळू कमी होत चाललेल्या टपाल पत्रव्यवहाराची परंपरा जतन करण्याच्या दृष्टीने हा संग्रह भारतीय टपाल वारशाचा मौल्यवान ठेवा म्हणून ओळखला जातो.न्या. मार्कंडेयवार यांचे उद्दिष्ट फक्त संग्रह करणे नाही, तर हस्तलिखित पत्रव्यवहाराची संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे आहे.

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचे मुख्य संपादक डॉ. सुनील पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या संग्रहातील व्याप्ती, वेगळेपणा आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, हा राज्यस्तरीय विक्रम 26 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतरित्या नोंदवण्यात आला आणि प्रमाणपत्र सन्मानपूर्वक त्यांना प्रदान करण्यात आले. न्या. मार्कंडेयवार यांच्या संग्रहातील सर्वात जुने पोस्टकार्ड सन 1892 चे असून, त्यांना 134 वर्षांपूर्वीचे हाती आलेले हे पोस्टकार्ड त्यांच्या संग्रहातील अत्यंत मौल्यवान घटक आहे. याशिवाय, 100 पेक्षा जास्त हत्तींचा अनोखा संग्रह असून, विविध धातू, संगमरवर, एबोनाईट, रबर इत्यादींवरून बनवलेले हत्ती आणि देश-विदेशातील हत्तीवरील पुस्तके, टपाल तिकिटे, नाणी, नोटा, कीचेन्स यांचा समावेश आहे. एका हत्तीच्या जोडीचे वजन 5 किलो आहे.या नव्या विक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande