
रायगड, 13 जानेवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्याचे क्षयरोगमुक्ती अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड, मुंबईने आपले सामाजिक जबाबदारीचे पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषद येथे ५५० क्षयरुग्णांना ३,३०० पोषणयुक्त फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक ऊर्जा व पोषण मिळत आहे, ज्यामुळे रोगमुक्तीचा मार्ग अधिक सुलभ व प्रभावी बनतो.
जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आधीच कॉर्पोरेट कंपन्यांना ‘निक्षय मित्र’ बनून या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत महानगर गॅस लिमिटेडने पुढाकार घेतल्याने या सामाजिक उपक्रमाला नवीन गती मिळाली आहे.
कार्यक्रमात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर, महानगर गॅसच्या सहाय्यक उपाध्यक्ष (मानव संसाधन) संकेत धोत्रे, मुख्य व्यवस्थापक सुसंता कुमार राउत, सहाय्यक व्यवस्थापक प्रियांका दळवी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी रुग्णांना फूड बास्केट वितरणासह पोषणाचे महत्व स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या, “क्षयरोगमुक्त रायगड जिल्ह्यासाठी केवळ शासनाच्या उपक्रमांवर अवलंबून राहता येणार नाही, तर कॉर्पोरेट क्षेत्राचे योगदानही आवश्यक आहे. अधिकाधिक कंपन्यांनी ‘निक्षय मित्र’ बनून रुग्णांच्या उपचार आणि पोषण आहारासाठी पुढाकार घ्यावा.” महानगर गॅस लिमिटेडच्या या उपक्रमामुळे केवळ रुग्णांचे पोषण सुधारले नाही, तर समाजात क्षयरोगाविषयी जागरूकता वाढीस लागली आहे. उपक्रमाच्या यशामुळे भविष्यात रायगडमध्ये सामाजिक, आरोग्य व पोषण क्षेत्रातील पुढाकार वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके