
पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात येत्या गुरुवारी (१५ जानेवारी) १२ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ‘मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडणे, तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी (१६ जानेवारी) मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रासह शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
‘पुणे शहर, उपनगरात तीन हजार ९८३ मतदान केद्रे (बुथ) आहेत. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी राहणार आहेत. शहरातील ९१३ इमारतीत मतदान होणार आहे. तेथे दोन पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक गस्त घालणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तासह गुन्हे शाखेचे पथके तैनात केली जाणार आहेत. मतदान सुरू असताना शहरातील सर्व घडमोडींचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकारी घेणार आहेत. अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्वरीत तेथे पोलीस पोहोचतील, अशा पद्धतीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे’, असे त्यांनी नमूद केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसाेडे, पंकज देशमुख, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु