
रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : ठेव सुरक्षा व बचतीसाठी रत्नागिरी डाक विभागाने येत्या १९ जानेवारीपासून विशेष मोहीम आखण्यात आली आहे.
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात भविष्याची तरतूद, मुलांचे शिक्षण, वृद्धांची जबाबदारी या दृष्टीने बचतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपली बचत सुरक्षित व नियमित परतावा देणारी असणे अत्यंत महत्वाचे आहे. यादृष्टीने पोस्ट खात्यातील बचत हा एक अत्यंत सुरक्षित व खात्रीशीर पर्याय आहे.
जनसामान्यांना बचतीचे विविध लाभ मिळावेत या दृष्टीने पोस्ट खात्याकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून १९ जानेवारी ते २४ जानेवारी २०३६ या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष मोहीम राबवली जात असून या काळात जास्तीत जास्त खाती उघडण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. १० वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी एसएसए खाते, गरजेनुसार विविध मुदतीसाठी मुदत ठेव, आवर्ती खाते, पीपीएफ खाते अशा विविध आकर्षक व खातेदारास लाभदायक अशा या विविध योजना पोस्ट खात्याकडून राबवल्या जात आहेत.
डिसेंबर २०२५ अखेर पोस्ट खात्याच्या रत्नागिरी विभागामध्ये १०,९१,२७७ बचत खाती असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एप्रिल २०२५ पासून डिसेंबर २०२५ पर्यन्त एकूण १,२५,५२० एवढी नवीन पोस्ट खाती उघडण्यात आली आहेत.
परताव्याची नियमितता व पैशांची सुरक्षितता या दृष्टीने डाक खात्याचे स्थान कायमच अग्रणी आहे. सर्वांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.
पोस्टाच्या विविध बचत योजना व व्याजदर असे -
सेव्हिंग्ज खाते ४%, १ वर्ष मुदत ठेव ६.०९%, २ वर्षे मुदत ठेव ७.००%, ३ वर्षे मुदत ठेव ७.०१% , ५ वर्षे मुदत ठेव ७.०५% पाच वर्षे आवर्ती ठेव ६.०७% , ज्येष्ठ नागरिक बचत योजना ८.०२%, मासिक उत्पन्न योजना ७.४%, सुकन्या समृद्धी खाते योजना ८.०२%, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (पीपीएफ) ७.०१%, राष्ट्रीय बचत योजना ७.०७%, किसान विकास पत्र (११५ महिन्यांत परिपक्व) ७.०५%.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी