रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारीदरम्यान सागर महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे अंबर हॉल येथे १५ ते १८ जानेवारीदरम्यान सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन करण्यात आले आहे. कांदळवन बोट सफरीने महोत्सवाला प्रारंभ होणार असून त्यानंतर व्याख्याने, खडकाळ किनारा अभ
रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारीदरम्यान सागर महोत्सवाचे आयोजन


रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे अंबर हॉल येथे १५ ते १८ जानेवारीदरम्यान सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन करण्यात आले आहे.

कांदळवन बोट सफरीने महोत्सवाला प्रारंभ होणार असून त्यानंतर व्याख्याने, खडकाळ किनारा अभ्यास फेरीचेही आयोजन केले आहे.

यात १५ जानेवारीला सकाळी ७ वाजता कर्ला जेटी येथून होड्यांमधून खारफुटी जंगलाचा अभ्यास दौरा होईल. यात खारफुटी व किनारी परिसंस्थेची माहिती तज्ज्ञ हेमंत कारखानीस व शांभवी चव्हाण सांगणार आहेत. सायंकाळी भाटकरवाडा परिसरातील शैवाळ, खडकाळ किनारा आदींचा अभ्यास प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे मार्गदर्शनाखाली होणार आहे.

दुसऱ्या दिवशी, १६ जानेवारीला महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सकाळी ९ वाजता मुख्य अतिथी म्हणून डॉ. शैलेश नायक उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त मुख्य वैज्ञानिक डॉ. बबन इंगोले हे समुद्री खनिजसंपत्ती आणि जैवविविधतेवरील परिणाम यावर बोलतील. प्रसिद्ध सागरी पर्यावरणशास्त्र आणि संवर्धनतज्ज्ञ डॉ. आपटे यांची मुलाखत डॉ. अमृता भावे घेतील. जबाबदार पर्यटनावरील लघुपट व पथनाट्य फर्ग्युसन महाविद्यालय आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय सादर करतील. त्यानंतर डॉ. संतोष शिंत्रे यांचे पर्यावरण संप्रेषण या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. ईशा बोपर्डीकर सागरी सस्तन प्राणी या विषयावर सादरीकरण करतील.

महोत्सवात १७ जानेवारीला सकाळी भाट्ये समुद्रकिनारी पुळण अभ्यास फेरी आयोजित केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. नरसिंह ठाकूर सागरी संशोधन ते उद्योगविश्व या विषयावर मार्गदर्शन करतील. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ समीर डामरे महासागरातील निर्जीव संसाधने या विषयावर सादरीकरण करतील. जबाबदार पर्यटनावरील लघुपट सादर होतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शेखर मांडे यांचे हवामान बदल आणि जनसहभागाची भूमिका या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी भाटकरवाडा येथे खडकाळ किनारा अभ्यास फेरी होणार आहे. यात डॉ. अमृता भावे आणि प्रदीप पताडे मार्गदर्शक आहेत.

महोत्सवाचा समारोप १८ जानेवारीला आहे. या दिवशी सकाळी भाट्ये येथील पुळणीवर अभ्यास फेरी होईल. यानंतर शास्त्रज्ञ डॉ. संजय देशमुख आपल्या आतला महासागर - स्वप्नातला, सर्व जीवनाला आधार देणाऱ्या अनंत निळ्या रंगाचा शोध घ्या आणि त्याचे रक्षण करा या विषयावर सादरीकरण करतील. दुपारी ‘संगीत कुर्माख्यान’ – मॅंग्रूव्ह फाउंडेशनचे लोकनाट्य होईल. पर्यटन विभागाच्या उपसंचालक, शमा पवार जबाबदार पर्यटन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यानंतर समुद्रकिल्ल्यांच्या वन्यजीव सर्वेक्षणाचा अनुभव, सहभागींना बक्षीस वितरण झाल्यानंतर महोत्सवाचा समारोप होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande