
पुणे, 13 जानेवारी, (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे. मतदान यंत्रांची (ईव्हीएम) हाताळणी आणि वाहतूक यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल,’ असा इशारा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिला.
निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे निवडणूक कामकाजाविषयक सोमवारी आढावा बैठक आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे, अर्चना तांबे, अनिल पवार, दीप्ती सूर्यवंशी, नितीन गवळी, सुप्रिया डांगे, अर्चना पठारे, पल्लवी घाडगे यावेळी उपस्थित होते.आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘जाहीर प्रचार थांबल्यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया संपेपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुसूचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून बारकाईने लक्ष ठेवावे. या काळात आचारसंहिता कक्षाने प्रभावीपणे विविध पथके कार्यरत ठेवावीत. मतदार चिठ्ठ्या मतदारांपर्यंत वाटप करण्याचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु