
छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर
महानगर पालिकेच्या निवडणूक तसेच मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून शहरात एकूण चार हजार ६६७ पोलिस कर्मचारी अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्तात एक हजार ९८२ होमगार्डची नियुक्ती करण्यात आली असून राज्य राखीव पोलिस बल गटाच्या (एसआरपीएफ) एकूण एक कंपनी आणि दोन प्लाटून असे अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली. शहरात १५ जानेवारी रोजी महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभुमीवर मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे.
आयुक्तालयातील व बाहेरून आलेल्या घटकामधील पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी बोलविण्यात आलेले आहेत. या बंदोबस्ताअंतर्गत मतदान केंद्रावर, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर, मतदान केंद्रनिहाय, पेट्रोलिंग, सेक्टर पेट्रोलींग तसेच अतिसंवेदनशिल ठिकाणी फिक्स पॉइंट, पायी पेट्रोलिंग, ड्रोन कॅमेरे, साध्या वेशात, दामिनी पथक,
आरसीपी, क्यूआरटी, वाहतूक विभाग, राखीव बंदोबस्त, होमगार्ड हे रस्त्यावर उपस्थितीत राहणार आहे.
याशिवाय पोलिस बंदोबस्त मतमोजणी केंद्रावरही तैनात असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही भागात तणाव होऊ नये, यासाठी पोलिसांची नियमित पेट्रोलिंग राहणार आहे.
ग्रामीण भागात मनाई आदेश आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून १४ ते २८ जानेवारी २०२६ पर्यंत हे आदेश अमलात राहतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis