

अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) । महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी तब्बल ६६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळपासूनच अमरावती शहरातील विविध वितरण केंद्रांवरून ईव्हीएम मशिन्स व निवडणूक साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना करण्यास सुरुवात झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया कडेकोट पोलीस बंदोबस्तात व महसूल विभागाच्या देखरेखीखाली पार पडत आहे.शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात २ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी व होमगार्ड्सचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी