
रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : लांजा नगर पंचायतीमधील नवनिर्वाचित नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी एक आगळावेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला. नगरपंचायत हद्दीतील प्रभागांमध्ये कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या घंटागाडीमध्ये स्वार होऊन त्यांनी विविध प्रभागांमध्ये स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या.
घंटागाडी प्रभागांमधून फिरताना कचरा कशा पद्धतीने गोळा केला जातो, स्वच्छता कर्मचारी नागरिकांना कसे सहकार्य करतात, कचरा टाकताना नागरिकांना कोणत्या अडचणी येतात का, याची सविस्तर माहिती त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत घेतली. याशिवाय कचरा संकलन प्रक्रियेत अजून कोणत्या सुविधा किंवा सहकार्याची आवश्यकता आहे का, याबाबतही नागरिकांची मते जाणून घेतली.
पंढरीनाथ मायशेट्ये लांजा नगरपंचायतीतील प्रभाग क्र. २ मधून निवडून आले असले तरी केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता त्यांनी इतर काही प्रभागांमधून फिरत नागरिकांशी संवाद साधला. सकाळी आठ वाजल्यापासून त्यांनी घंटागाडीसोबत फिरण्यास सुरुवात करत स्वच्छता व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विशेषतः यावेळी त्यांनी नागरिकांना मदत करत कचरादेखील घंटागाडीमध्ये टाकला.
या उपक्रमामुळे नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून प्रतिनिधी थेट मैदानात उतरून समस्या समजून घेत आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ कार्यालयात बसून नव्हे तर प्रत्यक्ष कामात सहभागी होऊन जनतेच्या अडचणी समजून घ्याव्यात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी