
अकोला, 14 जानेवारी (हिं.स.) । महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेले आदिशक्ती अभियान गावोगाव प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. जिल्हास्तरीय समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या अभियानांतर्गत जिल्ह्यात ग्रामस्तरीय व सात तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी wcdadhishakti.in या पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अभियानाच्या माध्यमातून शासन योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत पोहोचवणे, महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत झालेल्या कामांचे मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर अनुक्रमे १ लाख, ५० हजार व २५ हजार, जिल्हास्तरावर ५ लाख, ३ लाख व १ लाख, तर राज्यस्तरावर १० लाख, ७ लाख व ५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे यांनी दिली.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.
----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे