
जि.प.व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
रायगड, 14 जानेवारी (हिं.स.) । राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने वेग आला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांच्या घोषणेमुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सातत्याने पुढे ढकलल्या जाणाऱ्या निवडणुकांमुळे राजकीय कार्यकर्ते व इच्छुकांमध्ये अस्वस्थता होती. अखेर निवडणूक तारखा जाहीर होताच विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवारांची धावपळ वाढली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचे सत्र आणि उमेदवारीसाठीची चाचपणी सुरू झाली आहे.
यंदा प्रचारासाठी अवघे सात दिवस उपलब्ध असल्याने प्रचार अधिक तीव्र व नियोजनबद्ध होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याचे संकेत मिळत असून उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, प्रशासनानेही निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. आरक्षण प्रक्रिया, मतदार याद्या आणि मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यात एकूण १७ लाख ३८१ मतदार असून २ हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके