श्री जगदंबा सुतगिरणीच्या जागेचा बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्याचे आदेश
सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.) : माढा येथील श्री. जगदंबा अनुसूचित जाती शेतकरी विणकरी सहकारी सुतगिरणीच्या जागेचा बेकायदेशीर खरेदी व्यवहार रद्द करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुर्डूवाडीचे प्रांताधिकारी यांन
श्री जगदंबा सुतगिरणीच्या जागेचा बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्याचे आदेश


सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.) : माढा येथील श्री. जगदंबा अनुसूचित जाती शेतकरी विणकरी सहकारी सुतगिरणीच्या जागेचा बेकायदेशीर खरेदी व्यवहार रद्द करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुर्डूवाडीचे प्रांताधिकारी यांना दिले आहेत. या आदेशामुळे सुतगिरणीचे मुख्य प्रवर्तक आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजीतसिंह शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याप्रकरणी माढा तालुक्यातील भाजपचे सक्रिय सदस्य समाधान केचे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मागासवर्गीय समाजाला उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाच्या मदतीतून श्री. जगदंबा सुतगिरणीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, सुतगिरणीवर शासनाचा सुमारे ६५ कोटी रुपयांचा बोजा असतानाही, प्रशासनाला हाताशी धरून आमदार बबन विठ्ठल शिंदे व रणजीतसिंह बबन शिंदे यांनी त्यांच्या मालकीच्या ‘सुनंदा कोटक्स प्रा. लि.’ या कंपनीच्या नावे सुतगिरणीची जागा बेकायदेशीररीत्या खरेदी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या व्यवहाराबाबत वारंवार तक्रारी होऊनही संबंधितांनी स्वतःच्या मालकीच्या जागेवर बोजा चढवणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचेही केचे यांनी नमूद केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या असतानाच महसूल मंत्र्यांनी या व्यवहारासंदर्भात आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

याशिवाय, समाधान केचे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रातही या पिता-पुत्रांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराबाबत गंभीर आरोप केले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande