
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)।भामा नदीवरील ( ता.खेड ) दोन पूल जीर्ण झाल्याने त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांच्या आणि सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून विभागाचा हा निर्णय जरी योग्य असला तरी यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मात्र मोठा वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागणार आहे.खेड तालुक्यातील भामा नदीवरील शेलु ते कुरकुंडी आणि कोरेगाव खुर्द ते कोरेगाव बुद्रुक या गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
कोरेगाव खुर्द आणि कोरेगाव बुद्रुक या दोन गावादरम्यान भामानदीवर जवळपास तीस वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारण्यात आला होता. परंतु अलीकडच्या काळात हा बंधारा वाहतुकीसाठी कमकुवत (जीर्ण ) ठरत आहे.काही महिन्यांपूर्वी देखील या पुलाच्या भरावाचा काही भाग ढासळला होता.भामनेर खोरे जोडण्यासाठी हा महत्वाचा पूल कम बंधारा आहे. एमआयडीसी भागात ये-जा करण्यासाठी कामगार,शेतकरी,विद्यार्थी यांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण रस्ता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु